आणखी किती संजयचे बळी घेणार आहे? सुहास खंडागळे यांचा जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला संतप्त सवाल!

 


देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर) 


    कोकण हा ग्रामीण भाग असल्याने शेतीच्या कामासाठी बाहेर गेलेल्यांना सर्पदंश होण्याचे प्रमाण जास्त असते अशात तालुक्याच्या ठिकाणी औषध उपचार न झाल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागतो,प्रत्येक तालुक्यात सर्पदंश वरील औषधे उपलब्ध करा अशी मागणी गाव विकास समिती मागील अनेक वर्षे करत असताना सुद्धा ढिम्म प्रशासन आणि सत्ताधारी याकडे का दुर्लक्ष करत आहेत? घटना ग्रामीण भागात घडत आहेत, मग त्या रुग्णाला जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी आणेपर्यंत जो उशीर होतोय,त्यात त्याचा मृत्यू होतोय याची जबाबदारी कोण स्वीकारणार ?आणखी किती संजय चे बळी तुमची ढिसाळ व्यवस्था घेणार आहे?असा संतप्त सवाल गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला केला आहे.


      लांजा येथील संजय लांबोरे या तरुणाला शेतात काम करताना सर्पदंश झाल्याने त्याचा उपचारा दरम्यान रत्नागिरी येथे मृत्यू झाला.सर्पदंश झाल्यानंतर लांजा येथे वेळेत उपचार मिळाले नाहीत. त्याला रत्नागिरी येथे उपचार साठी दाखल करण्यात आले, परिणामी उपचार मिळण्यास सुमारे नऊ ते दहा तासांचा उशीर झाला,जर त्याला वेळेत लांजा येथे तालुका रूग्णालय मध्ये उपचार मिळाले असते तर या तरुणाचा जीव वाचला असता.मात्र कोकणात शेतीच्या कामात अनेकांना सर्पदंश होतो हे माहीत असतानाही येथील लोकप्रतिनिधी,जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग तालुक्याच्या ठिकाणी सर्पदंश वरील सर्व औषधे उपलब्ध करून देण्यास का टाळाटाळ करतात?या लोकांची काहीच जबाबदारी नाही का?जर ग्रामीण भागात नागरिकांना  सर्पदंश होत असेल तर त्यावरील उपचार रत्नागिरी येथे जिल्हा रुग्णालयात का?तालुक्याच्या ठिकाणी पूर्ण उपचार का नाहीत?असा संतप्त सवाल सुहास खंडागळे यांनी विचारला आहे.आज 2020 उजाडले तरी कोकणातील तालुक्याच्या ठिकाणी अद्यावत रुग्णालये नाहीत हे दुर्दैवी आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने कोकणात सर्पदंशाने मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. जर तालुक्यातील रूग्णालय मध्ये उपचार झाले तर अनेकांचे जीव वाचतील.सर्पदंश झाल्यानंतर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी जो २ ते ३तासांचा गोल्डन अवर असतो तोच जर ग्रामीण भागातून शहरी भागात येण्यासाठी प्रवासात जाणार असेल तर रुग्णाचा जीव वाचणार कसा? याचा विचार जिल्ह्याच्या ठिकाणी बसणारे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी करणार आहेत का? असे सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे.गाव विकास समितीचे शिष्टमंडळ लवकरच जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट घेऊन या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधणार असल्याचे खंडागळे यांनी म्हटले आहे.