बहाद्दूरशेख पुलाला धोका निर्माण झाला असल्याने अवजड वाहतूक कराड किंवा कोल्हापूर मार्गे वळवावी -शौकतभाई मुकादम

 

चिपळूण/ लोकनिर्माण ( सोनाली मिर्लेकर)


चिपळूण शहरातील बहाद्दूरशेख वाशिष्ठी पुलावरून सध्या वाहतूक सुरू असून अवजड वाहतूक रात्रीच्या वेळी बंद असली तरी तो केवळ देखावाच आहे. दिवसा मोठमोठे कंटेनर येथून धावत असतात. यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असल्याने अवजड वाहतूक कराड किंवा कोल्हापूर मार्गे वळवावी, अशी मागणी माजी सभापती, पर्यावरणप्रेमी शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर असणारा वाशिष्ठीनदीवरील पूल महापुरामुळे खचला होता. यामुळे आठ-दहा दिवस वाहतूक पूर्णपणे बंद होती. यानंतर तांत्रिक तपासणी करून व पुलाची डागडुजी करून वाहतूक सुरू करण्यात आली होती परंतु त्यानंतर पूल पुन्हा खचला. अखेर पुन्हा दुरूस्ती करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. शिवाय अवजड वाहतूक सकाळी ७ वा. पासून ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरू करण्यात आली व रात्रीच्यावेळी अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे सांगण्यात आले. परंतु दिवसात मोठ्या प्रमाणात मोठ मोठे कंटेनर या मार्गावरून धावत असतात. त्यामुळे पुलावर वाहतुकीची कोंडी होते. दररोज होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक ग्रामस्थ कंटाळले आहेत.