लोकनिर्माण/ पुणे जिल्हा प्रतिनिधी( विनायक दोरगे)✍
दौंड -१०० शंभर कोटीमध्ये मंत्रिपद मिळवून देण्याची ऑफर देणाऱ्या चार भामट्यांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दौंडचे आमदार राहुल कुल यांना मंत्री पदासाठी नवीन सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी १०० कोटीची मागणी चार भामट्यांकडून करण्यात आली होती.१०० कोटी मधील २० टक्के रक्कम आता द्यावी लागेल व उर्वरित रक्कम मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर द्यावी लागेल असे भामट्यांकडून सांगण्यात आले होते . हा सर्व प्रकार आमदार राहुल कुल यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना सांगितला. या प्रकरणातील आरोपींनी आमदारांना मुंबईतील नरिमन पॉईंट येथे भेटायला बोलावले होते. यानंतर या प्रकरणात अँटी एक्स्टाॅर्शन सेल मुंबई पोलिसांनी वेशांतर करून सापळा रचून आरोपींनी आमदारांना भेटायला बोलावलेल्या ऑबेराॅय हॉटेल येथे एका आरोपीला अटक केली . आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार ह्यात आणखी तीन आरोपी निष्पन्न झाले असून आरोपींनी आणखी तिन ते चार आमदारांना संपर्क साधल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दौंडचे आमदार राहुल कुल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात भाजपा सरकार आल्यापासून दौंड तालुक्याला यावेळेस मंत्रीपदाची संधी मिळणार असल्याचे देखील चर्चा तालुक्यात व राजकीय वर्तुळात सुरू आहे.
