कोयना धरणग्रस्त आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा - सत्यजीतसिंह पाटणकर

 

पाटण लोकनिर्माण ( प्रतिनिधी  )

 कोयना धरणग्रस्तांच्या चौथ्या पिढीला आपल्या न्याय हक्कासाठी आजही आंदोलन करावे लागत आहे. अजून किती पिढ्या मातीत गेल्यावर शासनाला जाग येणार आहे ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त करताना धरणग्रस्तांना शंभर टक्के न्याय मिळेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहिल असा विश्वास  कोयनानगर येथे बोलताना व्यक्त केला.



      कोयनानगर येथे कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन व अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात श्रमिक मुक्ती दलातर्फे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यास व आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोयनानगर येथे आले असताना ते बोलत होते.

     यावेळी पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, बाळासाहेब कदम, रामभाऊ मोरे, सचिन कदम, दाजी पाटील व मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

       यावेळी पुढे बोलताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांशी चर्चा करून तत्कालीन उप मुख्यमंत्री व आमचे नेते अजितदादा पवार यांनी सकारात्मक निर्णय घेऊन न्याय देण्यास सुरुवात केली होती. परंतु महाविकास आघाडीचे सरकार जाऊन हे सरकार आले आणि ती संपूर्ण प्रक्रियाच ठप्प झाली. पुन्हां जैसे थे स्थिती निर्माण झाली. जर दरवेळी सरकार बदलल्यानंतर सरकारला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी माझ्या तालुक्यातील धरणग्रस्तांना व अभयारण्यग्रस्तांना आंदोलनच करावे लागणार असेल तर अशी शासन व्यवस्था काय कामाची  असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. या लोकांच्या समस्या सोडवताना कोणीही गट-तट , पक्षाचे राजकारण मधे आणू नये एक माणूसकी म्हणून या लोकांना न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .

     गेली अनेक वर्षं ही लोकं डॉ.भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आपला लढा देत आहेत. येथून पुढे मी व संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सोबत आहोत. हा लढा आता न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

     यावेळी पाटणकर यांनी उपस्थित आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला व  कोणत्याही स्वरूपाची मदत लागल्यास निःसंकोचपणे मागण्यास सांगितले. तसेच शासन दरबारी या आंदोलनाची नोंद घेण्यासाठी लवकरच मान्यवर नेते मंडळीची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

फोटो - कोयना धरणग्रस्त आंदोलनात बोलताना  सत्यजितसिंह पाटणकर , मान्यवर पदाधिकारी, धरणग्रस्त .