खेड/लोकनिर्माण ( काका भोसले)
चिपळूण खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील गोशाळेच्या जागेसह अन्य मागण्यांसाठी आमरण उपोषणाच्या नवव्या दिवशी मंगळवारी गोशाळा प्रमुख भगवान कोकरे यांनी पुकारलेले महामार्ग रोको आंदोलन खेड पोलिसांनी रोखले. गुरांना महामार्गावर येऊच दिले नाही. त्यांना गोशाळा परिसरातच रोखण्यासाठी छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांची मदत घेण्यात आली. त्यानंतर कोकरेंना ताब्यात घेऊन उपचारासाठी कळंबणी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
गोशाळेच्या जागेचा प्रश्न मार्गी लावा, गोवर्धन गोवंश सेवा योजनेतून मिळालेल्या अनुदानातील उर्वरित २५ लाख रुपयांचे अनुदान तत्काळ द्या, आदी मागण्यांसाठी कोकरे यांनी गेल्या ९ दिवसांपासून गोशाळा परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे. तरीही शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने कोकरे यांनी मंगळवारी गुरांसह महामार्ग रोखो आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सायंकाळी ४ वाजता येथे महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे राज्याध्यक्ष, पंढरपूर येथील विठ्ठलरूक्मिणी मंदिराचे विश्वस्त प्रकाश महाराज जवंजाळ, राष्ट्रीय वारकरी सेनेचे कार्याध्यक्ष बापू रावकर, जालिंदर काळोखेपाटील आदी वारकरी साप्रदायाचे प्रमुख आल्यानंतर गुरांना महामार्गावर आणण्यासाठी गोशाळेतून सोडण्यात आल्यानंतर प्रवेशव्दारावरच पोलिसांनी खेड छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने या गुरांना रोखले. त्यामुळे एका बाजूंनी पोलीस, कार्यकर्ते गुरांना रोखत असताना दुसरीकडून गोशाळेचे कर्मचारी गुरांना महामार्गाकडे हाकलत होते. यात गुरांचे हाल होत असल्याचे लक्षात येताच कोकरे यांनी कार्यकर्त्यांना बाजूला होण्यास सांगितले त्यानंतर पोलिसांनी गोशाळेत गुरांना पाठविले व कोकरे यांना रुग्णालयात दाखल केले.