राजापूर लोकनिर्माण (सुनील जठार)
रिफायनरीच्या माती परीक्षणाच्या कामाला विरोध करीत मंगळवारी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केले. सकाळपासून येथील वातावरण तापले होते. मोठा पोलीस बंदोबस्त या भागात ठेवण्यात आला आहे.ग्रामस्थांचा विरोध असतानाही प्रशासनाने येथे माती परीक्षणाला सुरुवात केली आहे. या सर्व घडामोडींचे वार्तांकन करण्यासाठी या ठिकाणी माध्यम प्रतिनिधी उपस्थित आहेत. येथे घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती माध्यमे नागरिकांपर्यंत पोहचवत आहेत.
येथील वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचू नये, या हेतूने सकाळी माध्यम प्रतिनिधीना येथून हाकलण्यात आले. पुन्हा येथे दिसायचे नाही असा दम माध्यम प्रतिनिधीना देण्यात आला. तर काहींच्या हाताला धरून येथून बाहेर काढण्यात आले. माध्यम प्रतिनिधींसोबत केलेल्या अशा वागणुकीचा रत्नागिरीतील पत्रकारांनी निषेध केला आहे. जयस्तंभ येथील पत्रकार कक्षात काळ्या फिती लाऊन निषेध नोंदवण्यात आला. पत्रकारांना ही वागणूक दिल्याने राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.