रिफायनरीला विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले तर जालियनवाला बागेसारखे हत्याकांड येथे घडवले जाईल की काय अशी मानसिकता- खासदार विनायक राऊत यांचा आरोप

 

राजापूर लोकनिर्माण (सुनील जठार)

पोलिसी बळाचा वापर करुन राज्य सरकार रिफायनरी प्रकल्पासाठी जमिनीचे सर्वेक्षण केले जात आहे. याला विरोध करण्यासाठी जर लोक रस्त्यावर उतरले तर तेथे जालियनवाला बागेसारखे हत्याकांड घडवले जाईल, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला काही पोलिस तेथे रिफायनरीचे दलाल म्हणूनच काम करत असल्याचा आरोप करतानाच त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्यावरही कडाडून टीका केली.



   रत्नागिरीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रिफायनरीला सनदशीर मार्गाने विरोध करणाऱ्या लोकांना जबरदस्तीने तुरुंगात डांबले जात आहे. बैठकीला बोलावून तडीपारीच्या नोटीस दिल्या जात आहेत. ही सगळी दडपशाही रिफायनरी प्रकल्पासाठी केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. शनिवारी एकाच दिवशी बारसू परिसरातील प्रत्येक गावातील तीन चार लोकांना तडीपारीच्या नोटीस देण्यात आल्या, असेही ते म्हणाले.


यावेळी खासदार राऊत यांनी पोलिस खात्यावर सडकून टीका केली. पोलिसांची सध्याची भूमिका पाहता रिफायनरीला विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले तर जालियनवाला बागेसारखे हत्याकांड येथे घडवले जाईल की काय अशी मानसिकता पोलिसांची आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. शिंदे सरकार पोलिसी कारवाईचा अतिरेक करत आहे असेही ते म्हणाले.