पाटण/लोक निर्माण (श्रीगणेश गायकवाड)
पाटण महालातील प्रमुख असलेल्या किल्ले सुंदरगड- दातेगडावर "आपले किल्ले आपली जबाबदारी.." या मोहिमेअंतर्गत सातारा जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा पोलिस दलाने रविवारी सकाळी गड स्वच्छता मोहीम राबवली. प्रारंभी किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार खंजीर दरवाजातील गणपती, वीरहनुमान, सुंदरेश्वर देव- देवतांचे जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या हस्ते सहपत्नीक पुजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हा पोलिस प्रमुख बापू बांगर, आय, पी, एस अधिकारी- कमलेश मिना, डि.वाय.एस.पी- विवेक लावंड, पो.नि.- विकास पाडळे, पो.नि- उत्तमराव भापकर, घोंगडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख म्हणाले छत्रपती शिवकालीन गडकिल्ले हे आपला ऐतिहासिक अनमोल ठेवा आहे. या गडकिल्ल्यांचे जतन व त्यांचे संवर्धन करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सातारा पोलिस दलाने राबविलेल्या "आपले किल्ले आपली जबाबदारी.." या मोहिमेअंतर्गत आज सहाव्या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम यशस्वी झाली. या अगोदर स्वच्छता केलेल्या गडावर सहाशे किलो पेक्षा जास्त घणकचरा साफ केला आहे. मात्र येथील सुंदरगड संवर्धन समितीच्या मावळ्यांनी गड स्वच्छ ठेवल्याने गडावर फार स्वच्छता करावी लागली नाही. गड स्वच्छता साठी फिरुन पाहताना गडावरील ऐतिहासिक अवशेष कातळ खडकात खोदलेला खंजीर दरवाजा, गणपती, वीरहनुमान मुर्ती, गडावरील गडदेवता श्रीभवानी मातेचे स्थान, ऐतिहासिक वाडे -वस्ती, कचेरी यांचे पडलेल्या अवस्थेतील अवशेष, त्याच बरोबर कातळखडकात खोदलेले कोठारे, पागा, पाण्याचे टाके तसेच गडावरील मुख्य अवशेष भव्य तलवार विहीर व त्यामधील शिवलिंग मंदिर हा गडाचा ऐतिहासिक अनमोल ठेवा पाहता आला. यावेळी गडसंवर्धन समितीच्या मावळ्यांनी गडावरील प्रत्येक वास्तूची व अवशेषांची माहिती दिली. हा ऐतिहासिक अनमोल ठेवा आपल्या पुढील पिढीसाठी जतन होणे महत्त्वाचे आहे. तरच पुढच्या पिढीला आपल्या पुर्वजांचा इतिहास समजणार आहे. याबरोबर गडावरून आजुबाजूचा परिसर पाहताना या गडाला निसर्ग संपदा भरपूर आहे. नावाप्रमाणेच हा सुंदरगड आहे. असे सातारा जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख म्हणाले. त्याचबरोबर बाळासाहेब देसाई कॉलेज पाटणच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सहाय्यक जिल्हा पोलिस प्रमुख बापू बांगर म्हणाले- सुंदरगडावर सातारा जिल्हा पोलिस दलामार्फत स्वच्छता मोहीम राबविताना सर्व पोलिस दलात नवीन उर्जा निर्माण झाली. छत्रपतींचे कार्य आपल्यासाठी उर्जास्त्रोत आहे. हि उर्जा आपल्यात कायम ठेवायची असेल तर असे उपक्रम राबवले पाहिजेत. सातारा पोलिस दल समीर शेख साहेबांच्या नेतृत्वाखाली राबवत आहे. याचा सातारा पोलिस दलाला अभिमान आहे. ही ऐतिहासिक संस्कृती जतन करणे हि आपली जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी स्वच्छता मोहिमेच्या समारोप प्रसंगी सुंदर स्वराज्य प्रतिष्ठान- सुंदरगड संवर्धन समीतीच्या मावळ्यांनी जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांच्यासह पोलिसदलातील सहकार्यांचे सुंदरगड प्रतिमा व सुंदरगड माहिती पत्रक, कोयना पर्यटन पुस्तिका भेट देऊन सन्मान केला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष धर्यशिल पाटणकर, उपाध्यक्ष यशवंतराव जगताप, माजी सरपंच नारायण डिगे, सरपंच सिध्दार्थ देवकांत, मनोहर यादव, राम साळुंखे, लक्ष्मण चव्हाण, शंकर मोहिते, विक्रांत कांबळे, नितीन खैरमोडे, सुरेश संकपाळ, तसेच बाळासाहेब देसाई कॉलेज एन.एस. एस. कॅम्पचे प्रा.डॉ. जी.एस. पट्टेबहादुर, प्रा. डॉ. भरत जाधव, प्रा. श्रीगणेश गायकवाड यांच्यासह एन.एस.एस.चे विद्यार्थी, जि.प.प्राथमिक शाळा टोळेवाडी चे मुख्याध्यापक भालेकर गुरुजी व विद्यार्थी, सातारा पोलिस दल उपस्थित होते. सुंदरगड संवर्धन समितीचे मावळे मनोहर यादव यांनी सुंदरगडा संदर्भात माहिती देत सूत्रसंचालन केले व शेवटी सर्वांचे आभार मानले.