राजापूर लोकनिर्माण ( सुनील जठार)
तालुक्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणासाठी ड्रिलिंगच्या कामाला सुरवात होत आहे. या कामादरम्यान व्यत्यय होऊन कायदा सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी दि. २२ एप्रिल ते ३१ मे २०२३ दरम्यान प्रकल्प परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा राजापूरच्या तहसीलदार शितल जाधव यांनी दिला आहे.
यापूर्वी बारसू परिसरात सर्वेक्षण आणि भू सर्वेक्षणाद्वारे प्रकल्प विरोधात भूमिका घेणाऱ्यांकडून जोरदार विरोध झाला होता. तीव्र आंदोलने झाली होती. व कायदा सुव्यवस्थेला अडथळे निर्माण झाले होते. या प्रकरणी गुन्हे देखील नोंदविले गेले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित प्रकल्पातील माती परीक्षणासाठी डिलिंगचे काम सुरु होत आहे. या कामामध्ये व्यत्यय येऊन कायदा सुव्यवस्थेला बाधा येऊ नये, म्हणून प्रशासनाने मनाई आदेश लागू केला आहे.
तालुक्यातील बारसू सडा, बारसु पन्हळे तर्फे राजापूर, धोपेश्वर, गोवळ वरचीवाडी, गोवळ, खालचीवाडी गोवळ या ठिकाणी ड्रिलिंगचे काम सुरु असताना १ किमी व्यासाच्या परीघात प्रशासकीय व पोलीस यंत्रणेच्या परवानगी शिवाय प्रवेश व संचार करण्यास मनाई असेल. या कालावधीत समाज माध्यमांवर चिथावणीखोर वक्तव्य करणे, पोस्ट, चित्र, व्हिडिओ प्रदर्शित करणे, यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात भारतीय दंड संहिता १९६० चे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.