मुंबई लोकनिर्माण टीम
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची मेल-एक्स्प्रेससाठी तिकीट आरक्षणाची लगबग सुरू झाली आहे. यंदा गणरायाचे आगमन १९ सप्टेंबर रोजी होणार असून १६ मे २०२३ पासून रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी आरक्षण सुरु झाले आहे.परंतु, दुसऱ्या दिवशी कोकणात नियमित धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. गाड्यांची प्रतीक्षा यादी दोनशेच्याही पुढे गेली आहे. तर काही गाड्यांच्या ठराविक श्रेणीतील बोटावर मोजण्याइतपत आसने शिल्लक आहेत. गणेशोत्सवाला ४ महिने उरले असतानाच कोकणात जाणाऱ्यांनी रेल्वे गाड्यांचे आरक्षण करण्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोकण मार्गावर सर्वाधिक लोकप्रिय असलेली कोकणकन्या एक्सप्रेस दुसऱ्याच दिवशी हाऊसफुल झाली आहेत.