चिपळूण /लोकनिर्माण ( जमालुद्दीन बंदरकर)
अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी आज चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील मे. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे उपस्थित होते.
वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे अध्यक्ष प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, तहसीलदार प्रवीण लोकरे व इतर मान्यवरांचे स्वागत केले. शुभांगी साठे यांनी प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पातील उत्पादन प्रक्रिया, ईटीपी प्रकल्प, व्यवस्थापन पद्धती, स्वच्छता, सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतलेली काळजी आदींची पाहणी करून साठे यांनी प्रकल्पाचे कौतुक केले. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. वाशिष्ठी डेअरीची सर्वच उत्पादने दर्जेदार आहेत. शासनाच्या सर्व प्रमाणकांचे पालन करून या दुग्धप्रकल्पातील उत्पादन सुरू आहे. त्यामुळे यापुढे प्रशासनाच्या स्तरावर लागणारे सर्व सहकार्य या प्रकल्पाला निश्चितच केले जाईल, असे आश्वासनही यावेळी शुभांगी साठे यांनी दिले.यावेळी मंडळ अधिकारी एस. आर. आयरे, पिंपळीचे तलाठी श्री. गाढवे तसेच वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे संचालक महेश खेतले, अविनाश गुडेकर, प्रशांत वाजे, प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रदीप मगदूम, गणेश कदम,संदीप पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.