राजापूर लोकनिर्माण /सुनील जठार
शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या १८ जून २०१९ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. याकरिता पात्र व्यक्ती /संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात ५०% अनुदान, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशी संरक्षण व संवर्धनाची जनजागृती ही या योजनेची प्रमुख वैशिष्टय़े आहेत.
वैयक्तिक मधपाळ, केंद्रचालक, प्रगतीशील मधपाळ, शेतकरी व इतर इच्छुक लाभार्थी या योजनेतील प्रमुख घटक आहेत. मधमाशी पालन योजना, प्रात्यक्षिक माहिती तसेच मुख्यमंत्री व पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना मेळावा महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ राबवित असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी गुरुवार दिनांक १० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत नगरवाचनालय राजापूर सभागृहात ता. राजापूर जिल्हा रत्नागिरी येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळावा निःशुल्क/मोफत असून सर्वांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रत्नागिरी तसेच सुनील जठार अध्यक्ष राजापूर तालुका बहुद्देशीय औद्योगिक सहकारी संस्था राजापूर आणि सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय रत्नागिरी द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, जेलरोड रत्नागिरी दूरध्वनी क्रमांक ०२३५२/२२२३७९ किंवा सुनील जठार भ्रमणध्वनी क्रमांक ९२७०५७९४०० येथे संपर्क साधावा.
कोकण विभागातील जंगल व फळबाग क्षेत्र अशी वैशिष्टय़पूर्ण निसर्ग संपदा असल्याने मध उद्योगाच्या विकासाला मोठा वाव आहे. शेतकऱ्यांनी स्वतंत्रपणे शेतीपूरक मध उद्योग सुरू केल्यास वर्षाकाठी चांगली अर्थप्राप्ती होऊ शकते. त्यामुळे कोकणातील जास्तीत जास्त शेतकर्ऱ्यांनी मध उद्योग करण्यास प्रवृत्त व्हावे अशी अपेक्षा व आवाहन मंडळामार्फत करण्यात येत आहे.