राजापूर /लोकनिर्माण (सुनील जठार)
राजापूर अर्बन को.ऑप. बँकेने आपली यशस्वी घौडदौड या आर्थिक वर्षातही कायम राखली आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात बँकेचा एकत्रित एकूण व्यवसाय ६५७ कोटींकडे नेताना या आर्थिक वर्षात बँकेने ५ कोटी ५ लाख इतका ढोबळ नफा मिळविला आहे. तर बँकेने आधुनिक सेवा सुविधांमध्ये पुढचे पाऊल टाकत आपल्या ग्राहकांसाठी युपीआय (क्युआर कोड) प्रणाली सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या आर्थिक वर्षात बँकेच्या १३ व्या आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण येथे पाचव्या शाखेचा शुभारंभ करणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष हनिफ मुसा काझी व मुख्यकार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
शतक महोत्सवी वर्षात कोरोना संसर्ग असल्यामुळे शतकमहोत्सव सांगता समारंभाचा कार्यक्रम घेता आलेला नाही तो सांगता समारंभ कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात नोव्हेंबर मध्ये करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजापूर अर्बन बँकेच्या सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील प्रगतीबाबत व रविवारी 3 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बँकेच्या १०२ व्या वर्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या वतीने बँकेच्या राजापूर शाखा प्रशिक्षण सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काझी व अहिरे यांनी या आर्थिक वर्षातील बँकेने केलेल्या आर्थिक प्रगतीचा व बँकेच्या १०२ व्या वार्षिक अहवालाचा आढावा व लेखा जोखा मांडला.
भविष्यात म्हणजे पुढील वर्षभरात बँकेचा एकत्रित व्यवसाय एक हजार कोटींवर नेताना बँकेचे शेडयुल बँकेत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले. बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि हितिचंतक यांच्या भक्कम पाठबळामुळे बँकेने आपल्या प्रगतीचा आलेख चढता ठेवल्याचे काझी यांनी नमुद केले. या आर्थिक वर्षात बँकेची मालवण येथे नवीन स्वमालकीच्या जागेत शाखा सुरू करण्यात येणार असून तसा प्रस्ताव आरबीआयडे आहे. तर 5 सप्टेंबर रोजी हातिवले येथे मिनी एटीएमसह बँकेचे दुसरे मिनी काऊंडर सुरू केले जाणार असल्याचे काझी यांनी सांगितले.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाप्रमाणे त्या काळात पात्र ठरलेल्या कर्जदारांना कर्जाची परतफेड करण्यासाठी मोरेटीयम कालावधी दिलेला होता व तशी तरतुद करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे बँकेच्या त्या पात्र कर्जदारांना कर्ज परतफेडीसाठी मोरेटीयम कालावधी देताना त्यांच्या कर्जाची तरतुद बँकेने केली होती. मात्र कोरोना कालावधी नंतर आता अशा कर्जदारांकडून नियमित कर्ज परतफेड सुरू झालेली असून तरतुद केलेल्या रक्कमेपैकी 6 लाख रूपये नफ्यात वर्ग करण्यात आल्याचे काझी यांनी सांगितले.
बँकेने या आर्थिक वर्षात आपल्या प्रगतीच्या आलेखाची कमान चढती ठेवली आहे. 407 कोटी 56 लाख इतका ठेवींचा टप्पा गाठताना या आर्थिक वर्षात सुमारे 55 कोटींची वाढ केली आहे. तर कर्जामध्ये सुमारे रु. 38 कोटी इतकी वाढ करून एकूण कर्ज रक्कम रु. 250 कोटी इतके केले आहे. त्यामुळे बँकेचा एकत्रित एकूण व्यवसाय हा 657 कोटींवर पोहचला आहे. या आर्थिक वर्षात १८५० इतक्या सभासदांची वाढ होऊन बँकेची एकूण सभासद संख्या ही २७,५७५ इतकी झाली आहे. राखीव निधीमध्ये रु.८५ लाखाची वाढ होऊन ते रक्कम रु. २२ कोटी ५० लाख इतका राखीव निधी झालेला आहे. बँकेने आर्थिक वर्षात सुमारे रु. १५ कोटींचीगुंतवणूकीत वाढ करून वर्ष अखेर सुमारे रक्कम रु. १५७ कोटी इतकी गुंतवणूक केली असल्याचे काझी यांनी सांगितले.
कर्ज पुरवठा करताना त्याच्या वसुलीतही सातत्य राखले आहे. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण कमी राखण्यात यश प्राप्त केलेले असून बँकेचा ढोबळ एन.पी.ए. हा १.३१% इतका असून गेले १३ वर्षे सातत्याने ०.००% एन.पी.ए. बँकेने राखला आहे. बँकेचे रिझर्व्ह बँक व शासनाच्या निकषानुसार कर्जाचे ठेवीशी प्रमाण (सी.डी. रेशो) ६१.२३% पर्यंत ठेवण्यात यश आले आहे. हे यश प्राप्त करण्यामध्ये बँकेच्या सर्व शाखांनी नियोजनबद्ध योगदान देऊन आपल्या शाखेचा आलेख उंचावत ठेवला.आपल्या ग्राहकांना आधुनिक सेवा पुरवीताना आता बँकेने युपीआय (क्युआर कोड पेमेंट ) प्रणालीचा वापर सुरू केला असून सर्व ग्राहकांना आता या सेवेचा लाभ घेतला येणार आहे. तर आपल्या मोबाईल व्हॉटसॅप नंबरवरूनही पेमेंट करण्याच्या पर्यायाची सोय ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे काझी यांनी सांगितले.
आपल्या भविष्यातील संकल्पांबाबत सांगताना काझी यांनी 3 नवीन शाखा सुरू करण्याचा मानस असून लवकरच मालवण मध्ये नवीन शाखा सुरू होईल असे नमुद केले. तर बँकेच्या शाखा स्वमालकीच्या जागेत नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील जनतेला बँकेची अधिकाधिक सेवा देता यावी यासाठी ग्रामीण भागात ग्राहक सेवा केंद्रांचा विस्तार करणार असल्याचेही त्यांनी नमुद केले. बँकेच्या संगणक प्रणाली डेडा सेंटरप्रमाणेच डेटा रिकव्हरी सेंटरही लवकरच सुरू करणार असल्याचे काझी यांनी सांगितले. बँकेच्या कामकाजात अधिक सुसुत्रिकरण आणताना मुख्य कार्यालयात वेगवेगळया विभागनिहाय कामासाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वयीत करणार असल्याचे नमुद करत बँकेच्या शतकमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात नोव्हेंबर मध्ये करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बँकेची १०२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ३ सप्टेंबर रोजी नवाळे कॉप्लेक्स येथील मातोश्री सभागृहात सकाळी ९.३० वाजता होणार असून या सभेला बँकेच्या सर्व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन काझी यांनी केले आहे.
या पत्रकार बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर, संचालक संजय ओगले, राजेंद्र कुशे, किशोर जाधव, प्रकाश कातकर, दिनानाथ कोळवणकर, सौ. प्रतिभा रेडीज, विवेक गादीकर, बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक लक्ष्मण म्हात्रे¸ रमेश काळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत बँकेचे अधिकारी प्रसन्न मालपेकर यांनी केले तर आभार उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर यांनी मानले.