राजापूर लोकनिर्माण प्रतिनिधी
राजापूर शहर आणि तालुका परिसरात गेले दहा दिवस सुरू असलेल्या गणेशोत्सव सणाची गुरूवारी अनंतचतुर्दशीच्या दिवशी सांगता झाली. मात्र या गणेशोत्सव काळात राजापूर पोलीस प्रशासन आणि राजापूर नगर परिषदेने केलेल्या सुयोग्य अशा नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली राजापुरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ऑन डुटी चौवीस तास सेवा बजावताना गणेशोत्सव काळात आपले कर्तव्य चोख पार पाडले आहे. शहरासह ग्रामीण भागात गणपती आगमनासह गणपती विसर्जन मिरवणूक काळात चोख पोलीस बंदोबस्त ठेवत तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
या संपुर्ण काळात पोलीस निरीक्षक भरत धुमाळ हे शहरासह ग्रामीण भागातील परिस्थिवर जातीनीशी लक्ष ठेऊन होते.
तर राजापूर शहरात मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विसर्जन स्थळांसह शहरातील स्वच्छता, पुरेशी प्रकाश व्यवस्था व अन्य सेवा सुविधांबाबत केलेल्या नियोजनाचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
शहरातील रस्त्यांवरिल खड्डे भरणे, रस्ते स्वच्छ ठेवणे, पुरेश प्रकाश व्यवस्था, विसर्जन घाटांवर प्रकाश व्यवस्थेबरोबरच गणपती विसर्जनासाठी पोहणाऱ्या तरूणांची फौज, निर्माल्य विसर्जन व्यवस्था यांसह अन्य बाबींकडे जातीनिशी लक्ष देण्यात आले होते. मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लिपीक जितेंद्र जाधव व सर्व अधिकारी कर्मचारी यासाठी परिश्रम घेत होते. या काळात बांधकाम, आरोग्य व अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनीही महत्वपुर्ण भूमिका बजावली आहे.
या एकूणच काळात सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व त्यांचे पदाधिकारी, सर्व घरगुती गणेशभक्त यांनी मोलाचे सहकार्य केल्यानेच गणेशोत्सव सण अत्यंत चांगल्या पध्दतीने पार पडल्याचे धुमाळ व भोसले यांनी सांगितले.