राजापूर अर्बन बॅंकेची सर्वसाधारण वार्षिक सभा उत्साहात संपन्न

 

राजापूर लोकनिर्माण ( सुनील जठार)

शतकोत्तर वाटचाल करताना आणि ‘सर्वसामान्यांची जिव्हाळयाची बँक’ ही बिरूदावली जपत राजापूर अर्बन बँकेने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात केलेल्या आर्थिक प्रगतीचा गौरवपुर्ण उलेख करत सभासदांनी रविवारी पार पडलेल्या बँकेच्या १०२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेवर अभिनंदनाचा वर्षाव केला.  बँकेचे नुतन संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी सभासदांनी पारित केला.



तर यावर्षी बँकेच्या  सभासदांना संचालक मंडळाने शिफारस केलेला दहा टक्के लाभांश मंजूर करताना बँकेने पुढील वर्षी मात्र १५ टक्के लाभांश सभासदांना द्यावा अशी मागणीही यावेळी सभासदांनी केली. तर बँकेच्या एकूणच आर्थिक हिताबाबत अत्यंत चांगली चर्चा करताना उपस्थित सभासदांनी आपल्या विविध सुचनाही यावेळी मांडल्या.



यावेळी बँकेचे अध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी सभासदांचे विश्वस्त म्हणून काम करताना कायमच सभासदांचे आणि बँकेचे हित डोळयासमोर ठेऊनच आंम्ही काम करत आहोत, व यापुढेही करत राहू, त्यामुळे आपण उपस्थित केलेले प्रश्न आणि सुचनांची योग्य पध्दतीने दखल घेऊन कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही यावेळी सभासदांना दिली.

राजापूर अर्बन बँकेची १०२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा रविवारी बँकेचे अध्यक्ष हनिफ मुसा काझी यांच्या अध्यक्षतेखाली नवाळे कॉप्लेक्स येथील मातोश्री सभागृहात  पार पडली. यावेळी उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, सीईओ शेखरकुमार अहिरे आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.  

आपल्या अध्यक्षीय भाषणात काझी यांनी बँकेच्या एकूणच प्रगतीचा आढावा घेतला. बँकेचे सभासद, हितचिंतक, ठेवीदार, कर्जदार तसेचे बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे सुयोग्य नियोजन आणि सहकारी संचालकांची भक्कम साथ यामुळे बँकेची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी बँकेच्या सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडला. भारतीय  रिझर्व्ह बँक आणि सहकार खात्याच्या सूचना व मार्गदर्शक तत्वांचे पालन करत उत्पन्न आणि खर्च यांचा सुयोग्य ताळमेळ साधत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात ठेवी, कर्जवितरण, वसुली, नफा, एकुण व्यवसाय अशा सर्वच आघाडीवर साधलेल्या चौफेर प्रगतीबद्दल व विविध पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल समाधान व्यक्त करत अध्यक्ष, व नवनिर्वाचित संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांचे अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. सभासद उल्हास खडपे, मंदार सप्रे, हरीभाऊ ठाकूर, सुनिल जठार यांनी तसा ठराव मांडला व अनुमोदन दिले.

याप्रसंगी बँकेच्या वार्षिक अहवालावर चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सभासद रामचंद्र वरेकर, हरिभाऊ ठाकूर, शंकर चोरगे, प्रतिभा मराठे यांनी अहवालावरील मुद्दयांवर चर्चा केली. वरेकर व ठाकूर यांनी यावेळी वार्षिक अहवालाबाबत विविध सूचनाही केल्या. या सुचनांची नोंद घेत नक्कीच कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही यावेळी अध्यक्ष काझी यांनी दिली. उल्हास खडपे यांनी ज्येष्ठ नागरीकांसाठी बँकेने सहकार्य करावे अशी मागणी यावेळी केली. याबाबचे पत्र आपण बँकेला दिल्याचे त्यांनी सांगितले. यावर नक्कीच आवश्यक ते सहकार्य करू असे काझी यांनी यावेळी सांगितले. तर बँकेचे माजी अध्यक्ष लियाकत काझी, जयप्रकाश नार्वेकर, राजापूरचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमिर खलिफे यांसह मंदार सप्रे, सुशांत मराठे, जी. आर. कुलकर्णी यांनीही यावेळी विविध मुद्यांवर चर्चा केली व आपल्या सूचना मांडल्या. सुशांत मराठे यांनी हंगामी कर्मचाऱ्यांना बँकेने सेवेत सामावून घेण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केली. यावर त्याबाबत टप्याटप्याने कार्यवाही केली जाईल असे अध्यक्ष काझी यांनी सांगितले. १०० टक्के कर्ज वसुली करणाऱ्या साखरीनाटे शाखेचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

या बैठकीत मागिल सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करतानाच सन २०२२-२३ चा अहवाल, ताळेबंद व नफा तोटापत्रक वाचून मंजूर करण्यात आले. २०२२-२३ च्या अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चाला मंजूरी देण्यात आली. लेखा परिक्षण व दोषदुरूस्ती अहवाल वाचून नोंद घेण्यात आली. सन २०२३-२४ च्या अंदाजपत्रकाला मंजूरी देण्यात आली.

या  सभेला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, सुकाणू समितीचे अध्यक्ष अनिल ठाकूरदेसाई, दीपक बेंद्रे, भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा सौ. श्रृती ताम्हनकर, सौ. रसिका कुशे, प्रेरणा अमरे, सौ. शीतल पटेल, मोहन पाडावे, कृष्णा खांबे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुभाष बाकाळकर, विजय हीवाळकर, लोकनिर्माण चे सहसंपादक सुनील जठार, ज्येष्ठ महीला सभासद श्रीमती हर्डीकरकाकू  आदींसह सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.  सुत्र संचालन बँकेचे एसडीओ प्रसन्न मालपेकर यांनी केले. तर संचालक अ‍ॅड. शशिकांत सुतार यांनी मानले. याप्रसंगी बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक लक्ष्मण म्हात्रे, रमेश काळे, लेखापाल कमल चव्हाण, संगणक विभागाचे प्रमुख प्रसन्न खांबे, सर्व शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बँकेचे सभासद व तरूण कार्यकर्ते मंदार सप्रे व महेश नकाशे हे वकिली परिक्षा पास झाल्याबद्दल त्यांचा बँकेच्या वतीने या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष हनिफ काझी व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.




Popular posts
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image