राजापूर / लोकनिर्माण( सुनील जठार)
काही दिवसांवर येवुन ठेपलेल्या गणेशोत्सवासह ईद ए मिलाद सणादरम्यान समस्त तालुकावासीयानी जबाबदारीने वागले पाहिले . पर्यावरण, ध्वनी, नदी, नाले यांचे प्रदुषण होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी राजापूरात आयोजीत शांतता समितीच्या बैठकीत उपस्थीत तालुकावासीयाना केले. त्याच वेळी बेजबाबदार वर्तन करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असा खणखणीत इशारा देखील त्यांनी दिला.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दल अंतर्गत राजापूर पोलीस दल आयोजीत गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणांच्या पार्श्वभुमीवर राजापूर तालुका शांतता समितीची बैठक पंचायत समितीच्या किसान भवनात पार पडली त्यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणुन जिल्हा पोलीस अधिक्षक बोलत होते . त्यावेळी व्यासपिठावर राजापूरच्या उपविभागिय अधिकारी (प्रांत )श्रीमती वैशाली माने, तहसीलदार श्रीमती शितल जाधव, राजापूर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, गटविकास अधिकारी विवेक गुंड, पोलीस उपविभागिय अधिकारी यशवंत केडगे यासह विविध विभागाचे अधिकारी ,तालुक्यातील आणि राजापूर शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी नागरीक आदी उपस्थीत होते.
गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणांच्या पार्श्वभुमीवर उपस्थीत तालुकावासीयानी सुरवातीला काही प्रश्नांवर उपस्थीतांचे लक्ष वेधले यामध्ये विद्युत वितरण, खड्डेमय रस्ते, महामार्गावरील समस्या, एसटी सेवा यासह भटकी जनावरे, मोकाट कुत्रे आदींवर उपस्थीतांचे लक्ष वेधले होते.
राजापूर शहर हे संवेदनशील नाही तर ऐतिहासिक पार्श्वभुमी असणारे मोठे शहर आहे . येथील निसर्ग रचना जनतेप्रती असलेली स्नेहभावना सहकाराची भुमिका निश्चीतच कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार जिल्हा पोलीस अधिक्षक कुलकर्णी यान्नी काढले. गणेशोत्सवाला लवकरच सुरवात होत आहे त्यानंतर समस्त मुस्लीम बांधवांचा ईद ए मिलाद हा सण आहे. या सणासुदीच्या काळात समस्त जनतेने आपली जबाबदारी ओळखुन शांततेत सण साजरा करावा असे त्यांनी आवाहन केले. कोकणात येणाऱ्या चाकरमानी मंडळींसाठी त्यांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. महामार्गावर १४ ठिकाणी स्वागत कक्ष सुरु करण्यात आले आहेत. अशी त्यांनी माहिती दिली. संवेदनशीलपणे सण साजरे करा, जबाबदारीने वागा, सणाला गालबोट लागेल आणि समाजात तेढ निर्माण होईल असे बेजबाबदार वर्तन कुणी केल्यास त्याची अजिबात गय केली जाणार नाही. कडक कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पुढे बोलताना दिला. सोशल मिडीयाचा जबाबदारीने वापर केला पाहिजे कोणताही आलेला मेसेज असो त्याची खात्री केली पाहिजे समाजावर परीणाम होतील असे मेसेज फॉरवर्ड केले जावू नयेत असे आवाहन त्यांनी केले.
सण साजरे करीत असताना पर्यावरणाला हानी पोचणार नाही त्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे शिवाय नदी ,नाले ,ध्वनी यांचे प्रदुषण होवू नये म्हणुन जागरुक राहिले पाहिजे असेही आवाहन जिल्हा पोलीसान्नी केले या मार्गदर्शन बैठकीत जिल्हा पोलीस अधिक्षकांसह प्रांताधिकारी श्रीमती वैशाली माने आणि राजापूरच्या तहसीलदार श्रीमती शीतल जाधव यान्नी बहुमोल मार्गदर्शन केले . शांतता समितीच्या बैठकीत उपस्थीत नागरीकान्नी मांडलेल्या प्रश्नांवर संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यान्नी उत्तरे देताना उचीत कार्यवाहीचे अश्वासन दिले. तालुका शांतता समितीची बैठक उत्साहात पार पडली .