राजापूरात शांतता समितीची सभा संपन्न, कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून सण शांततेत साजरे करा - यशवंत केडगे


राजापूर लोकनिर्माण (प्रतिनिधी)

गोपाळकाला उत्सवासह आगामी काळात येणारा गणेशोत्सव सण व मुस्लीम बांधवांचा ईद-ए मिलाद सण कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून शांततेत साजरे करा असे आवाहन उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी येथे केले. शांतता समितच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि मांडलेल्या सुचनांबाबत संबधित विभागांकडून योग्य पध्दतीने कार्यवाही केली जाईल अशी ग्वाहीही यावेळी केडगे यांनी दिली.



गोपाळ काला व आगामी काळात येणारा गणेशात्सव व मुस्लीम बांधवांचा ईद-ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमिवर उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर पोलीसांच्या वतीने शांतता समिती, मोहल्ला समिती, गणेशोत्सव मंडळे, पोलीस पाटील, विविध संघटना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राजापूर पोलीस स्थानकात झालेल्या या बैठकीप्रसंगी पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, गटविकास अधिकारी गुंडपाटील, बांधकाम विभागाचे उपअभियंता शंतनु दुधाडे, नगर परिषदेचे मुख्य लिपीक जितेंद्र जाधव, श्री. ढोणे, महावितरणचे श्री. पवार, एसटी विभागाचे अशोक दातार, आरोग्य विभागाचे अमित नवरे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी केडगे यांनी प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही देताना उपस्थित सर्व विभागाच्या अधिकारी व प्रतिनिधींकडून त्यांनी आढावा घेतला.


यावेळी शहर बाजारपेठेसह मुख्य रस्ता, पोलीस स्थानक परिरसरात होणारी वाहतुक कोंडी, अस्ताव्यस्त केले जाणारे पार्किंग, शहरात मोकाट गुरे आणि उनाड कुत्र्यांचा उपद्रव, महामर्गाचे रखडलेले काम व एसटी डेपो समोर असलेला सुविधांचा अभाव, साथीच्या आजारांचा वाढता जोर व अपुरी आरोग्य सुविधा, रस्त्यांवरिल खड्डे यांसह अनेक विषयांवर उपस्थित सदस्यांनी प्रश्न उपस्थित करून चर्चा केली. यावेळी केडगे यांनी सणांच्या पार्श्वभूमिवर संबधित विभागांनी याची दखल घेऊन कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या.याप्रसंगी झालेल्या चर्चेत भाजपा जिल्हाउपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमिर खलिफे, माजी नगरसेवक सुलतान ठाकूर, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, किशोर धालवलकर, आजिम जैतापकर, गोवळ सरपंच अभिजित कांबळे, अद्वैत अभ्यंकर, शौकत नाखवा, निजाम काझी, सौ. धनश्री मोरे आदींसह पोलीस पाटील व अन्य सदस्यांनी सहभाग घेतला व आपली मते मांडली.

पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी सर्व मंडळे व जनतेने पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले.