खेड/ लोकनिर्माण (प्रकाश खेडेकर )
रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस पाटील पदाची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्या अनुषंगाने पोलीस पाटील पदाच्या उमेदवारांनी तणावमुक्त परीक्षा द्यावी व भरघोस गुण प्राप्त करून सक्षम पोलीस पाटील पदी नेमणूक व्हावी, कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष आदरणीय पंढरीनाथ पाटील यांच्या मार्गदर्शन व सूचने नुसार खेड तालुका पोलीस पाटील संघटनेने गुरुवार दि. ०५/१०/२०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे पोलीस पाटील भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित केले होते.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका खजिनदार सौ. मालती दयालकर यांनी केली. त्यामध्ये पोलीस पाटील भरती मध्ये उमेदवारांना योग्य मार्गदर्शन मिळाल्याने परीक्षेचे दडपण दूर होईल व जास्तीत जास्त पदांची नियुक्ती होईल हा संघटनेचा उद्देश सांगताना. कोणत्याही भरती दरम्यान आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते. तसे प्रकार घडू नये म्हणून सावधगिरीच्या सूचना करण्यात आल्या. रत्नागिरी टाइम्सचे वार्ताहर श्री. दिवाकर प्रभू बाल व महिला आयोगाच्या सदस्या सौ. नंदिनी खांबे यांनी कार्यक्रमाचे कौतुक करून उमेदवारांना प्रोत्साहन दिले. ॲड. स्मिता कदम यांनी बाल विवाह प्रतिबंध कायद्या बाबत माहिती देऊन कायद्याचे पालन करण्याची शपथ दिली.
पोलीस पाटील पदाचे अधिकार व कर्तव्ये संबंधी जिल्हाध्यक्ष संदीप गमरे, जिल्हा संघटक सौ. पूजा गुरव यांनी मार्गदर्शन केले.
लेखी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, प्रश्न पत्रिका सोडवताना घायची दक्षता आदी बाबत मार्गदर्शन राज्य समन्वयक श्री. प्रकाश खेडेकर यांनी केले. त्याच प्रमाणे लेखी सराव प्रश्न पत्रिका सोडवून घेतली. तसेच उपस्थित केलेल्या सर्व शंकांचे निरसन केले. पोलीस पाटील संघटनेने आयोजित केलेल्या प्रशिक्षणामुळे आमच्यावरील परीक्षेचे दडपण दूर होऊन आमचा आत्मविश्वास वाढल्याचे समाधान उपस्थित उमेदवारांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तालुका संघटक श्री. पांडुरंग शिर्के यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस पाटील सर्व पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.