कोतवली मधली वाडी अकरा दिवस तहानलेली. पाणी योजनेच्या ठेकेदाराकडून ग्रामस्थांवर अन्याय, ग्रामस्थ आक्रमक.

 

खेड /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)

 खेड तालुक्यातील कोतवली मधली वाडी मधील ग्रामस्थ गेले अकरा दिवस पिण्याच्या पाण्यासाठी व्याकुळ झाले असल्याचे पहावयास मिळत आहे. येथील एमआयडीसी ने पुरविलेल्या पाणी योजनेच्या देखभाल दुरुस्तीच्या ठेकेदाराकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.परिणामी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत.



         खेड तालुक्यातील कोतवली हे गाव लोटे परशुराम एमआयडीसीच्या पश्चिम दिशेला डोंगराळ भागात वसलेले गाव आहे. सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वी लोटे येथे रासायनिक कारखान्यांची औद्योगिक वसाहत सुरू झाली. भौगोलिक दृष्ट्या कोकणातील सर्व जलस्रोत हे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. आणि रासायनिक कारखाने कोतवली, सोनगाव,घाणेखुंट या गावांच्या पूर्वेला असून ही गावे पश्चिमेला आहेत.त्यामुळे साहजिकच या गावांमधील सर्व नैसर्गिक जलस्रोत दूषित व नष्ट झालेले आहेत. आणि म्हणूनच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पंचक्रोशीतील सर्वच गावांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी पंचक्रोशीतील गावागावात पाणी योजना राबवली.कालांतराने या पाणी योजनेची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी काही ठेकेदार नेमले. कोतवली गावातही या पाणी योजनेची देखभाल दुरुस्ती आणि पाण्याची वितरण व्यवस्था सांभाळण्यासाठी एका स्थानिक ठेकेदाराला ठेका दिला गेला. कोतवली येथे एमआयडीसी कडून आलेल्या मुख्य लाईन वर हेडर बसविण्यात आलेले आहेत. त्या हेडर वरून प्रत्येक वाडीला एक एक इंचाच्या दोन लाईन दिल्या गेलेल्या आहेत.परंतु कोतवली मधली वाडी साठी दिलेल्या दोन लाईन पैकी एक लाईन ग्रामस्थांना कोणतीही पूर्व सूचना न देता अथवा विश्वासात न घेता ठेकेदाराने परस्पर काढून उरलेल्या एका लाईनच्या शेजारी जोडली. यामुळे दोन्ही लाईन मध्ये हवा भरली गेल्यामुळे दोन्ही लाईनला पाणी येणे बंद झाले आहे असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.याबाबत वाडीतील ग्रामस्थांनी वारंवार ठेकेदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.परंतु ठेकेदाराने कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही अथवा प्रतिसाद दिला नाही, असा आरोप मधली वाडीतील ग्रामस्थांकडून केला जात आहे. सदर वाडीतील ग्रामस्थ कंटाळून लोटे येथील पोलीस दूरक्षेत्रावर धडकले. लोटे पोलीस दुरक्षेत्रावरील पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा ठेकेदाराला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तोही अयशस्वी ठरला. या दरम्यानच्या काळात कोतवली गावच्या सरपंच सौ. अक्षता तांबे यांनी वाडीतील ग्रामस्थांना दोन पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरविले. तरीही संबंधित ठेकेदार वाडीतील ग्रामस्थांची पाण्याची अडचण समजून घेत नसल्यामुळे वाढीतील ग्रामस्थ आक्रमक झाले असून एमआयडीसी अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे तक्रार करून सदर ठेकेदार याचे ठेकेदारी बंद करून आम्हाला दुसरा ठेकेदार द्यावा अशी मागणी करणार आहेत, असे सांगण्यात आले. याप्रसंगी सरपंच सौ. अक्षदा तांबे, ग्रामपंचायत सदस्य श्री. मंगेश तांबे, सौ. प्रियांका पाष्टे यांच्यासह ग्रामस्थ श्री. सुशील बेनकर, श्री.गणेश बेनकर, पांडुरंग पाष्टे,राजाराम तांबट, गुणाजी मोरे,महेंद्र मोरे,शांताराम कदम, प्रकाश चव्हाण,संदीप कदम,दगडू तांबट आदींसह सुमारे ७० ते ८० महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.



Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image