संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेढी तर्फे सत्कार सोहळा संपन्न
गुणवंत सभासद, माजी संचालक, कर्तॄत्ववान महिला सभासद व कर्मचारी यांचा सत्कार
देवरुख व संगमेश्वर शाखांमध्ये उत्साह
संगमेश्वर लोकनिर्माण प्रतिनिधी
संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतसंस्थेच्या देवरुख व संगमेश्वर या शांखांमध्ये खूपच आनंदाचे वातावरण होते. निमित्त होते सत्कारांचे. पतसंस्थेला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजेच हीरक महोत्सवी वर्षानिमित्त सुरुवातीपासूनचे माजी संचालक, कर्तॄत्ववान महिला सभासद, गुणवंत सभासद व कर्मचारी वर्ग यांचा सत्कार रविवार दि. १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वा. देवरुख शाखेत व सायं. ४ वा. संगमेश्वर शाखेत संपन्न झाला. या शाखांच्या कार्यक्षेत्रात राहणा-यांसाठी सोईचे व्हावे यासाठी हा कार्यक्रम त्या त्या शाखेत आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात सत्काराबरोबरच संबंधितांना भेटवस्तूही देण्यात आल्या.
कार्यक्रमास पतसंस्थेचे मार्गदर्शक व नवी मुंबईचे मा. उपमहापौर अविनाश लाड, अध्यक्ष शांताराम सालप, उपाध्यक्ष कृष्णा सोलकर, संचालक पांडुरंग खाडे, भाऊ कांगणे, राजाभाऊ चिंचवलकर, दिलीप बोथले, संदिप गमरे, तज्ञ संचालक शांताराम गोरुले व मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम खामकर हे मान्यवर उपस्थित होते.
देवरुख येथे माजी संचालक- बाळकृष्ण पर्शराम व सभासद रामचंद्र घाणेकर, रवींद्र सुवारे, महेंद्र करंबेळे, दिलीप गोवळकर- सरपंच नांदळज, सौ. शितल करंबेळे माजी पंचायत समिती सदस्य देवरुख तसेच संगमेश्वर येथे सुहास गेल्ये, नथुराम पाचकले, शंकर बोले यांनी सत्काराला उत्तर देताना आम्ही सर्व भारावून गेल्याचे सांगून संचालकांचे आभार मानले.
अध्यक्ष शांताराम सालप यांनी आपण सर्व कार्यक्रमांना बहुसंख्येने उपस्थित राहता याबद्दल आनंद व्यक्त केला.
मार्गदर्शक अविनाश लाड यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. मोठे कर्जदार आपल्याकडे आणणे गरजेचे असून आपण व्यवसायात उतरणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. काजू व बांबू लागवड याबाबतही माहिती दिली. सामुदायिक विवाह योजना सुरू करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दोन्ही ठिकाणी एकूण ४० जणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमुर्ती यांच्यासह बहुसंख्येने सभासद उपस्थित होते.
मुंबईत राहणा-या संबंधितांसाठी असाच कार्यक्रम दि. २० एप्रिल २०२५ रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.