महाबोधी महाविहार वैशाख पौर्णिमेपर्यंत मुक्त न झाल्यास तीव्र आंदोलन करणार; बिहार आणि केंद्र सरकारला इशारा देत आंबेडकरी तोफ कडाडली

 

मुंबई  (रामदास धो. गमरे)

"महाबोधी महाविहार मुक्त व्हावे यासाठी सिलोन देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणारे जननायक भन्ते अनागारिक धम्मपाल यांनी सन १८९१ महाबोधी सोसायटीची स्थापना करून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला सुरवात केली त्यावेळी तेथील तत्कालीन महंत घमंडगिरी यांनी भन्ते अनागारिक धम्मपाल आणि त्यांच्या शिष्यांना अतोनात त्रास दिला, विहारात असणाऱ्या ५ बुद्धमूर्ती व त्यांची आई महामाया यांना ५ पांडव व द्रौपदी बनवून त्यांना भ्रष्ट व विद्रुप केले, अनागारिक धम्मपाल आणि त्यांच्या शिष्यांनी १८९३ साली १६०० वर्षे पूर्वीची जुनी बुद्धमूर्ती वरच्या माळ्यावर बसवण्याचा प्रयत्न केला असता महंत घमंडगिरी व त्याच्या साथीदारांनी अनागारिक धम्मपाल आणि त्यांच्या शिष्यांना बेदम मारहाण केली ज्यात अनागारिक धम्मपाल यांच्या दोन सहकाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला त्याविरुद्ध कोर्टात केस दाखल केल्यानंतरही मनुवादी सरकारच्या संगनमताने कोर्टाने आरोपी महंत घमंडगिरी व त्याच्या साथीदारांची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर भन्ते नागार्जुन सुरई ससाई यांनी ही आंदोलन सुरू ठेवले परंतु मनुवादी सरकारने ते ही दडपशाही पध्दतीने वारंवार दडपण्याचा प्रयत्न केला आजही भारत आणि जगभरातील भन्तेजींच्या नेतृत्वाखाली उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन सूरु आहे, सन १९५० ला भारतीय संविधान लागू होऊन मागील जुने कायदे रद्दबाद झाले असताना ही बौद्धगया मंदिर कायदा १९४९ याचा आधार घेत ब्राम्हण पंडित महाबोधी महाविहारात बौद्ध धम्म, विचारांची अवहेलना करीत पशुबळी, कर्मकांड, पिंडदान करीत आहे, देश-विदेशातून येणारा करोडो रुपयांचा निधी लाटण्याकरता भगवान गौतम बुद्धांना विष्णूचा अवतार आहे अशी भाकडकथा निर्माण करून निधी लुटला जातोय म्हणून १९४९ चा कायदा रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे ही आमची साधी मागणी आहे आमचा लढा कोणत्याही जाती-धर्माविरोधात नसून तो केवळ आमचे विहार आमच्या ताब्यात द्या याकरता असून तो केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित नसून तो जागतिक पातळीवर पोहोचला असून युनोने ही त्याची दखल घेतली आहे म्हणून बिहार सरकार व केंद्र सरकारला महामोर्चाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की वैशाखी पौर्णिमेपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त करून आम्हा बौद्धांच्या ताब्यात द्या वैशाखी पौर्णिमेपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त न झाल्यास पुन्हा तीव्र महाआंदोलन करणार" असा कडक इशारा बिहार व केंद्र सरकारला महाबोधी महाविहार मुक्ती महाआंदोलनावेळी उपस्थित जनसागराला संबोधित करत असताना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी दिला.

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने निघालेल्या या महामोर्चात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी आणि इतर धार्मिक, सामाजिक, राजकीय संस्था आणि पक्षांच्या पाठिंब्याने बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने राणीची बाग (भायखळा) ते आझाद मैदान असा महामोर्चा समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सदर महामोर्चा काढण्यात आला. महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर सदर महामोर्चाचे सभेत रूपांतर झाले सदर सभेचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी केले, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, मनिषा आंबेडकर, अमन आंबेडकर, जेष्ठ साहित्यीक ज. वि. पवार, रिपब्लिक विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आशिष गाडे, बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, कोषाध्यक्ष नागसेन गमरे, माजी उपकार्याध्यक्ष विवेक पवार, किशोर मोरे, भारतीय बौद्ध महासभेचे मुंबई अध्यक्ष विलास वानखेडे, वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे, अशोक सोनोने तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते, भन्ते शांतिरत्न आणि त्यांचा संघ, भन्ते लामा यांची विशेष उपस्थित प्रामुख्याने होती, सदर महामोर्चास रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग अश्या संपूर्ण कोकणातून लाखोंच्या संख्येने जनसागर लोटला होता ज्याने केंद्र व राज्य सरकारला धडकी भरली म्हणून मुंबई पोलिसांना पुढे करून सदर महामोर्चा दडपण्याचा निंदनीय प्रयत्न सरकारने केला, जागोजागी नाकाबंदी करून कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली, गाड्यांना पुढे जाऊ दिले नाही त्यामुळे आनंदराज आंबेडकरांनी केंद्र, राज्य शासन व मुंबई पोलिसांचा निषेध केला तसेच सरकारने इतकी दडपशाही व दंडेलशाही वापरून ही त्याला न जुमानता छातीचा कोट करून भीमसैनिकांनी सदर महामोर्चास उपस्थिती लावून सदर महामोर्चा यशस्वी केल्याबद्दल सर्व भीमसैनिकांचे धन्यवाद देऊन आभार व्यक्त केले.

सदर सभेत भिक्षु संघाच्यावतीने भन्ते शांतिरत्न, भन्ते लामा, विनोद मोरे, विजय वानखेडे, राजेंद्र पातोडे, विवेक पवार, जेष्ठ साहित्यिक ज. वि. पवार यांनी ही आपले विचार व्यक्त केले. भीमराव आंबेडकरांनी आपले विचार मांडत असताना "सम्राट चंद्रगुप्त मोर्या याने जगभरात राज्य केले व त्यानंतर १४ राज्य १४ बौद्ध राजांनी या देशात ८४,००० बौद्ध लेण्या, स्तूप, शिल्प बांधली असा सुवर्ण बौद्धकाळ या देशाने पाहिला आहे, जेथे बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली त्याठिकाणी सम्राट अशोकाने महाबोधी महाविहार निर्माण केले परंतु बामणी पंडितांनी त्यावर अतिक्रमण करून बुद्धाची अवहेलना सुरू केली आहे, त्याठिकाणी जे भन्तेजी आंदोलनास बसले आहेत त्यांच्यावर सरकार दबाब आणून रातोरात त्यांना चांगल्या जागेवरून उचलून घाणीत त्यांना बसवले आहे, मी स्वतः त्याठिकाणी जाऊन आलोय आणि परत तिथे जाणार आहे, काही दिवसांनी बिहारमध्ये निवडणूका होणार आहेत त्यावेळी सर्वांनी एकत्रित येऊन महाबोधी महाविहार हा विषय घेऊन लढावं लागेल आणि आपलं विहार आपल्या ताब्यात घ्यावं लागेल महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांनी ही तिथे यावे" असे प्रतिपादन केले. सम्यक कोकण कला संस्था आणि महाराष्ट्रातील तमाम कलावंतांच्या वतीने महाकवी विष्णू शिंदे यांनी महाबोधी महाविहार मुक्त करावे यासाठी हिंदी गीत सादर केले.

आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या सदर महामोर्चास समाजातील अनेक स्तरातील लोकांनी पाठिंबा देत जवळपास अडीच तास मुंबई रोखुन सरकारला बौद्ध धम्माची ताकद दाखवुन दिली, मुस्लिम बांधवांनी ही सदर मोर्चास भरभरून प्रतिसाद देत शिवरायांचा मावळा व बाबासाहेबांचा अनुयायी रियाज मुकादम या मुस्लिम बंधूने आपला संपूर्ण मुस्लिम समाज शेवटच्या क्षणापर्यंत सदर महामोर्चास पाठिंबा देईल असे जाहीर केले सरतेशेवटी सर्वांचे आभार व्यक्त करून आनंदराज आंबेडकरांनी महामोर्चाची सांगता केली.