प्रभाव अभ्यासाची मार्गदर्शक तत्त्वे आणि अभ्यासाची सूत्रे देणारा ग्रंथ    - श्री संतोष बुरुड 

 


                 
        मधू मंगेश कर्णिक यांच्यावरील आंबेडकरी विचारांचा प्रभाव ' भाकरी आणि फूल ' कादंबरीत दृश्यमान झालेला आहे. तो त्या कादंबरीतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा यामधून स्पष्टपणे जाणवत राहतो.  स्वातंत्र्योत्तर  भारतीय भवतालावर  मानवी जीवनात लक्षणीय बदल झाले. हे बदल  लेखकांना साहित्य निर्मितीसाठी खूपच महत्वाचे ठरले आहेत. सदा कऱ्हाडे, रणजीत देसाई, मधू मंगेश कर्णिक, अशा अनेक लेखकांनी स्वातंत्र्योत्तर दलित जीवनात झालेला बदल कादंबरीतून सूक्ष्मपणे मांडला आहे. कोकणच्या पार्श्वभूमीवर  दलितांच्या तीन पिढ्यात होणारा बदल कर्णिक यांनी 'भाकरी आणि फूल 'या कादंबरीत चित्रित केला आहे. त्यामधून लेखकावर विशिष्ट विचारसरणीचा, घटनांचा, समाजातील बदलाचा प्रभाव जाणवतो. प्रस्तुत समीक्षेच्या पुस्तकामध्ये कर्णिक यांच्यावरील विचारांच्या प्रभावाचा शोध घेण्याचा प्रयत्न डॉ. सतेज दणाणे यांनी केला आहे. त्यामधून 'प्रभाव अभ्यास 'करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे, प्रभाव अभ्यासाचे सूत्र अभ्यासकांना सापडते. कादंबरी वाङ्मयप्रकारचा अभ्यास करण्याची दिशा मिळते. 


          प्रभाव अभ्यासाची दिशा, प्रभाव अभ्यासाचे सूत्र मांडणारे पुस्तक असे स्वरूप ' आंबेडकरी विचारप्रभावातील कादंबरी... ' या पुस्तकात 'भाकरी आणि फूल '  या कादंबरीच्या आधारे उलगडून दाखविलेले आहे. 


          'भाकरी आणि फूल आंबेडकरी विचारप्रवाहातील कादंबरी ' हे लांबलचक असे शिर्षक मधू मंगेश कर्णिक यांची ' भाकरी आणि फूल 'ही कादंबरी, आंबेडकरी विचारप्रवाह  या दोन बाबींचा निर्देश करते. त्याबरोबर कोकणाचा परिसर, स्वातंत्र्योत्तर  पंचवीस वर्षाचा कालखंड, त्याकाळातील  सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय स्थिती, आणि दलितांचे जीवन अशा  प्रदीर्घ परीघाची चर्चा करण्यात आलेली आहे. प्रस्तुत पुस्तकात प्रभाव अभ्यास कसा केला जाऊ शकतो याचा एक स्थूल आराखडा उभा केला आहे. प्रभाव अभ्यासाचे सूत्र त्यामधून आकार घेते.


        समाजजीवनातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक बाबींचा प्रभाव पडतो. एखाद्या घटनेचा, व्यक्तीचा प्रभाव पडतो. तसा विविध धारांचा  प्रभाव समाजमनावर पडत असतो. लेखक  हा समाजजीवनातील संवेदशील सजीव घटक असल्याने त्यांच्या मनावर या घटनांचा, विचारांचा प्रभाव पडत असतो. मधू मंगेश कर्णिक हे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक आहेत. त्यांचे बालपण कोकणच्या 'करूळ 'या खेड्यात गेले आहे. त्याकाळातील विविध घटना, व्यक्ती आणि विचारधारा त्यांनी अनुभवलेल्या आहेत. समाजातील विषमता, जातीयता, भेदाभेद, अस्पृश्यता त्यांनी बघितलेली आहे. स्वातंत्र्यानंतर एकूण समाजजीवनात होणारे बदल आणि विशेषतः दलित जीवनात झालेले बदल त्यांनी अगदी जवळून अनुभवलेले आहेत. दलित जीवनात परिवर्तन करणाऱ्या घटना आणि विचारधारा यांच्या प्रभावातून ' भाकरी आणि फूल ' ही कादंबरी आकाराला आली असल्याचे डॉ. सतेज दणाणे यांनी नमूद केले आहे. यामधून  एखाद्या विचार धारेचा शोध घेण्याची दिशा मिळू शकते. 


      लेखकाने अनुभवलेले समाजवास्तव  आणि कलाकृतीत झालेला समाजविपर्यास याचा अंदाज येतो. कादंबरीच्या अभ्यासाने कादंबरी लेखकाची अभ्यासपूर्ण मुलाखत कशी घेतली जावी थोडक्यात  मुलाखत तंत्रांची माहिती मिळते. 'भाकरी आणि फूल -आंबेडकरी विचार प्रवाहातील कादंबरी ' हा ग्रंथ छोटा असला तरी मार्गदर्शक  आणि दिशादर्शक आहे. त्यापेक्षा प्रभाव अभ्यासाचे सूत्र मांडणारा म्हणून विशेष महत्वाचा आहे. या ग्रंथासंदर्भात  डॉ. रवींद्र ठाकूर  लिहितात, '' डॉ. सतेज दणाणे  यांनी लिहिलेल्या या पुस्तकात या कादंबरीची वस्तुनिष्ठ चिकित्सा करण्यात आलेली आहे. त्यांनी या कादंबरीच्या जमेच्या बाजू जशा दाखविलेल्या आहेत ; तशा मर्यादाही निर्भीडपणे अधोरेखित केल्या आहेत. त्यामुळे या पुस्तकाचे मोल वाढले आहे. होतकरू अभ्यासकांनी या पुस्तकाचे जरूर अवलोकन करावे आणि एखाद्या साहित्यकृतीची वस्तुनिष्ठ समीक्षा कशी करावी हे समजून घ्यावे. ( प्रस्तावना ) असा हा कादंबरी, समीक्षा, आंबेडकरी विचार, दलित जीवन स्वातंत्र्योत्तर समाजजीवनातील बदल यांचा अभ्यास करण्यासाठी हा ग्रंथ मार्गदर्शक ठरतो. तसाच विशेष म्हणजे प्रभाव अभ्यासाची मार्गदर्शक तत्त्वे आणि अभ्यासाची सूत्रे देणारा म्हणून ही  विशेष अभ्यासनीय आहे.     समीक्षा ग्रंथ -


      ' भाकरी आणि फूल आंबेडकरी विचारप्रवाहातील कादंबरी '


डॉ. सतेज दणाणे 


अक्षर प्रकाशन 


प्रथम आवृत्ती २६जानेवारी २०१६.


              विनम्र,


श्री. संतोष काडप्पा बुरुड


         सहसंशोधक,


डिपार्टमेंट ऑफ मायक्रो बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी सेन्टर,


दि. महाराजा सायजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बरोडा, वडोदरा (गुजरात).


मो. 9731491196, 8208398993


ई-मेल- santoshburud51@gamil.com