जिल्ह्यातील दीड लाख वीज ग्राहकांकडे ७६ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी, शासनाच्या पोकळ घोषणांमुळे महामंडळ व ग्राहक अडचणीत

 


रत्नागिरी /लोकनिर्माण (सुनील जठार)


      रत्नागिरी जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार ग्राहकांकडे वीज बिलापोटी ७६ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीचे प्रमाण लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वाधिक वाढल्याने वसुलीसाठी महावितरण कंपनी अधिकार्‍याना विशेष मोहीम हाती घ्यावी लागणार आहे.
घरगुती विजेचा वापर करणार्‍या १,२६,४८३ ग्राहकांकडे ४० कोटी ७७ लाख रुपये, वाणिज्य विजेचा वापर करणार्‍या १९२५३ ग्राहकांकडे १४ कोटी ६८ लाख ४७ हजार रुपये, औद्योगिक विजेचा वापर करणार्‍या २६९९ ग्राहकांकडे ७ कोटी ६३ लाख ४४ हजार रुपये, कृषी विजेचा वापर करणार्‍या ७६ ग्राहकांकडे ६९ हजार रुपये, अन्य दीड लाख ग्राहकांकडे ६ कोटी ४४ लाख रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.
      ग्राहकांनी वापरलेल्या युनिटनुसार बिलांची आकारणी करण्यात आली आहे. लॉकडाऊनपासूनची विद्युत बिले माफ केली जातील अथवा कमी केले जातील असे वारंवार शासनाकडून  घोषणा करण्यात आल्या त्यामुळे ही बिले कमी केली जातील अशी ग्राहकांना आशा होती. प्रत्यक्षात शासनाने घोषणा व्यतिरिक्त काहीही न केल्याने ग्राहकांची ही थकबाकी वाढत गेली.  त्यावेळी पोकळ घोषणा करून शासनाने  लोकप्रियता मिळवली मात्र प्रत्यक्षात आता ग्राहकांना ही वीज बिले भरावी लागणार आहेत त्यामुळे ग्राहकही अडचणीत आले असून थकबाकीमुळे महामंडळ पण अडचणीत आले आहे.